Follow Us @soratemplates

Friday 3 December 2021

कोंकण २ दिवेआगार चा समुद्रकिनारा ....

कोंकण  २  दिवेआगार चा समुद्रकिनारा ....


 

समुद्रावर पुन्हा सकाळी जायचं म्हणुच पहाटेलाच जाग आली 

साडेपाच चा  गजर लावला होता .. फारसं अस उजाडलं नव्हतं ...

जरा काळोख होतांच .. . अधुंकसा उजाडलं होतं  

आळस झटकुन टाकुन पटकन उठलो ... 

झपाझप येऊन पोचलो समुद्रकिनाऱ्यावर ... 

वाह किती रम्य सकाळ ती ,किती प्रसन्न सकाळ ती ... 

अवीट गोडी ची भुपाळी सहज ओंठांतुन उमटली .... 

घनश्याम सुंदरा श्रीधरा  अरुणोदय झाला हा .. 

उठी लवकर वनमाळी उदयाचळी मित्र आला हा .... 

सुर्योदय बराच वेळा पहिला अनुभवाला ... 

पण इतक्या विस्तीर्ण  किनारा समुद्राला लाभलेला इथे ... 

असं बाळ सूर्याचं रूप प्रथमच अनुभवत होते ... 

सुर्य जेमतेम वर आलाय अन किरणं हळुवार पाण्यावर तरंगत होती ... 

सारं कसं शांत शांत होतं .... तीच शांतता मनाला बोलकं करीत होती ... 

किनाऱ्यावर अलगद बसून घेतलं ... त्या शान्ताव्यात कुठे व्यत्यय नको .. 

बराच वेळ आम्ही तिथे वाळुवर बसून राहिलो ... 

अनिमिष नेत्रांनी तो उदयाचळीचा सोहळा बघत राहिलो अन 

रंगांच्या तरंगांवरून  मन अंतरंगात शिरलं ... 

मन दुरवर बघत राहिलं ... अथांग सागर ...क्षितिजापार 

आभाळभर केशराची सोनेरी रंगांची  उधळले होतें ... 

ती केशराची रंगसंगत , सुवर्ण रंग कसे  एकमेकांत मिसळून गेले .. 

त्या रंगांचे  प्रतिबिंब अथांग  सागरानी पांघरले होते ... 

कोंकण ची हिरवाई ,आकाशाची निळाई त्यात  बहारली होती .

असा सुंदर सुर्योदय पाहतांना मन उचंबळुन आलं .. 

पुन्हा  जगन्नियंत्याची स्मरणं झाले अन दोहो करांनी भास्करला वंदन केले ..  

रात्रीच्या अंधःकारात प्रकाश वसलेला असतो ... 

प्रकाश ही हुलकावणी देत असतो ....अरे  शोधा मला शोध मला ... 

 शोधणाऱ्याला गवसेल प्रकाश ... अंधःकाराच्या गर्भात स्वतःला गुरफटुन घेतो ... 

लपाछपीचा डाव असतो अंधार कि .प्रकाश .. पण प्रकाश कुठे लपुन राहणार का ?

नकळत कुठूनशी एक तिरीप आपल्या पर्यंत येतें  

अन प्रकाशानं आपलं जीवन उजळून जातं ... 

सुर्यास्ता  नंतर सूर्योदय आहेच  .. रात्री नंतर दिवस उजाडणारं आहे 

अंधःकारा   नंतर प्रकाश  गवसणारं आहे .तमसो मा ज्योतिर्गमय ...

मन प्रसन्न होतं  ...चहूकडे  मन धावत हॊतं  ... हरखुन गेलं होतं .... 

नयनरम्य  दृश्य  मन साठवु पाहत होतं ....मनाला पंख लागले होते ... 

मन हुलकावणी देऊन बाहेर पडलं ... भिरभिरलं ... परत आलं ते अंतर्मनात .. 

ध्यानस्थ झालं .. स्थितप्रज्ञ ... मन  म्हणतं होतं ..शांतम शांतम .. 

सागराच्या विशाल  हृदयावर अवखळ लाटांचं राज्य होतं ...

सागराला उधाण आलं जणु , फेसाळणाऱ्या लाटांकडे ते अनिमिष नेत्रांनी पाहत होतं .. 

हातात हात गुंफून लाटांचं ते  नर्तन  खुप सुखद वाटतं होतं... 

एकमेकांच्या गळा पडून ,,, सुखदुःखाच्या कहाण्या सांगत ... 

निर्मिती कुठे  अन किनारा कुठे दुर दुर ... हाच तो भवसागर तर नाही .. 

नमोनमः देवा ... तुझं अस्तित्व  जाणवलं ... जाणवतं राहिलं ... 

 पण ह्या उसळणाऱ्या लाटांना कोण घाई ? कोण गाठतोय किनारा लवकर .. 

झिम्मा फुगडी घालत लाटा धडकतात  किनाऱ्यावर ... 

लाटांचं सुखद नर्तन किनाऱ्यावर येऊन थांबतं ... स्थिरावतं 

किनारा पुन्हा शांत शांत .... प्रशांत प्रशांत ...

लेखांकन --- ऍड . अर्चना गोन्नाडे  archana gonnade 
















 


No comments:

Post a Comment