सोनंपावली श्री महालक्ष्मी
सोनंपावली श्री महालक्ष्मी
माहेर पणाला लेकी येणार,अडीच दिवसां करीता
किती सारी तयारी करायची ..
घरअंगण स्वच्छ , जाळे जळमट काढायचे
रांगोळी रेखायची सुंदर दारांत ,त्यावर हळदीकुंकू
फुलोऱ्याच्या सुंगंध घरभर दाटलेला ...
लाडू करंज्या ,अनारसे शंकरपाळी
चटपटीत चिवडा पण सोबतीला अन चकली ....
इकडे पूजेची तयारी करायाची....
उदबत्ती धूप निरंजन चांदीची भांडी पूजेची
सुंदर हार गुलाबाचे ,पत्री गोळा करायच्या....
खंडीभर कामं ,पण आनंदाने सगळं करायचं..
सुहास्यवदनी .. स्वागत करायचं
.महालक्ष्मी येणार सोनपावलांनी...
---------------------------------------
आल्या गं लक्ष्मी ,आल्या गं बाई ...
कश्याच्या पायी , लेकीसुनांच्या पायी
आल्या गं लक्ष्मी ,आल्या गं बाई ...
कश्याच्या पायी , सुखसमृध्दीच्या पायी...
आल्या गं लक्ष्मी ,आल्या गं बाई ...
कश्याच्या पायी , विदयेच्या पायी ...
असं म्हणत साऱ्या घरभर महालक्ष्मीना ....
स्वच्छ सुंदर घरातुन फिरवायचं ...
सुखसमृध्दीला स्थानापन्न करायचं.
महालक्ष्मीना विराजमान करायचं ...
महापुजा बांधायची ....
मनोभावे प्रार्थना करायची ,कामना करायची
दैदिप्तमान उज्वल यशाची
किकिणणारी ,थबकणारी सोनपावलं.....
घरभर फिरू देतं माझ्या ...
महालक्ष्मी येणार सोनपावलांनी ....
श्री महालक्ष्मीचें आगमन झाले ...
स्थानापन्न झाल्यात ....
भरजरी वस्त्रांमध्येच किती प्रसन्नता विलसत होती
सुवर्णआभा पसरली होती मुखवट्याभोवती ...
घर अंगणात दिवे उजळले ...
समईच्या शांत ज्योतीं मनांत स्थिरावल्या ...
ओम हिरण्य वर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम
श्रीसूक्त गेल्या कित्येक वर्षांपासुन म्हणतेय ...
परंतु प्रत्येकदा ते नवीन अनुभूती देऊन जातं ...
काही छान नकळत घडतं जातं ...
आकारतं राहतं ,साकारतं राहतं
आणि मग आवर्तनावर आवर्तेने....
किती आवर्तने करायची ?
अंतर्मनाने लय साधली ,.सुर गवसला
ओम हिरण्य वर्णाम हरिणीम ..
.साक्षात महालक्ष्मी मनःपटलावर साकारली ...
सोनपावलांनी महालक्ष्मी आल्यात ...
घर अंगण फुलुनं आलं,
महालक्ष्मी आल्यात
माहेरपणाला ...
..... शुभं भवतु------
लेखांकन ---- adv अर्चना गोन्नाडे
सोनंपावली श्री महालक्ष्मी
.
.